Tips

१. आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावे. तेथील हवा खेळती असावी.

  1. स्वयंपाक करताना नेहमी ॲप्रन वापरावा व हात पुसण्यासाठी स्वच्छ नॅपकिन वापरावा.
  2. ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा व शेगडीदेखील नेहमी पुसून स्वच्छ ठेवावी. म्हणजे मुंग्या येत नाहीत.
  3. तयार पदार्थ नेहमी झाकून ठेवावा.
  4. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे नॅपकिन्स रोजच्या रोज धुवावेत म्हणजे चिकट होत नाहीत.
  5. स्वयंपाकघरात वापरावयाचे डबे वारंवार धुऊन स्वच्छ करावेत अन्यथा ते चिकट होतात.
  6. साठवणीच्या वस्तू ठेवायचे मोठे डबे बंद करताना त्यांची झाकणे वर्तमानपत्राने पूर्ण झाकून लावावीत.
  7. झाकण असणारी कचरापेटी वापरावी. ती रोज धुऊन सुकवून वापरावी. नाहीतर त्याला वास येतो.
  8. स्वयंपाकघरातील ओट्यासमोर खिडकी असावी म्हणजे फोडणीचा धूर, वास निघून जातो. तसे नसल्यास चिमणी बसवून घ्यावी, नाहीतर स्वयंपाकघरात चिकटपणा, काळपट डाग दिसून येतात.
  9. फ्रीजमध्ये पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत. आठवड्यातून एकदा फ्रीज पूर्ण साहित्य काढूढून पुसून स्वच्छ करावा. म्हणजे त्यातून अनावश्यक साहित्यदेखील बाहेर निघते.
  10. कपाटात व सिंकमध्ये डांबरगोळ्या ठेवाव्यात, म्हणजे झुरळांचा उपद्रव होत नाही.
  11. पंधरा दिवसांनी किचनमधील पेपर बदलावेत.
  12. तेलाचे भांडे वरचेवर घासून स्वच्छ ठेवावे.
  13. मायक्रोवेव्ह मिक्सर, ओव्हन वापरून झाल्यावर ओल्या कपड्याने पुसून स्वच्छ करावा व कापडाने झाकून ठेवावा.
  14. महिन्यातून एकदा काचेच्या सर्व वस्तू काढून धुऊन, पुसून पुन्हा लावाव्यात.
  15. किचनमध्ये नेहमी वही-पेन ठेवावे. म्हणजे एखादी वस्तू संपल्यास त्याची नोंद ठेवण्यास सोपे जाते. किराणा भरताना ही यादी महत्त्वाची ठरते.
  16. तेलकट भांडी धुण्याअगोदर त्यात गरम पाणी घालून उकळावे.
  17. तळून घेतलेले पनीर कडक होते. ते टाळण्यासाठी पनीर तळून लगेचच पाण्यात टाकावे म्हणजे नरम राहते.

१. गहू दळताना त्यात थोडे सोयाबीन घातल्याने त्याचा पौष्टिकपणा वाढतो. पाच किलो गव्हासाठी अर्धा किलो सोयाबीन वापरावे.

२. भाकरीसाठी ज्वारी दळताना त्यात एका किलोस पाव वाटी उडीद डाळ घालावी. पिठास चांगला चिकटपणा येतो.

३. साउथ इंडियन पदार्थांचे पीठ तयार करताना त्यात थोडे पोहे भिजवून वापरावेत किंवा गरम भात वापरावा म्हणजे पीठ हलके होते.

४. थंडीच्या दिवसात पीठ चांगले फुगून येण्यासाठी ते डब्यात भरून उबदार पांघरूणात झाकून ठेवावे. मिक्सरला लावताना त्यात गरम पाणी वापरावे.

५. कढीपत्ता धुऊन, स्वच्छ पुसून, काचेच्या बरणीत भरून ठेवावा. जास्त दिवस टिकतो व हिरवागार राहतो.

६. हळदीची पाने स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून ठेवावीत म्हणजे कधीही मोदक करताना उपयोगी पडतात.

७. दही लावताना थोडेसे विरजण पूर्ण भांड्याला लावून घ्यावे. नंतर कोमट दूध घालून वरखाली करून झाकून ठेवावे. दही घट्ट लागते.

८. दहीवडे, मेदूवडे करताना डाळीसोबत थोडे तांदूळ भिजवावेत म्हणजे वडे छान होतात.

९. नॉनव्हेज ग्रेव्ही करताना टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून वापरावी. म्हणजे वाटण कमी लागते.

१०. साबुदाणा खिचडी करताना भिजवलेल्या साबुदाण्यात मीठ, दाण्याचे कूट, साखर मिक्स करून घ्यावी व नंतर फोडणी करावी म्हणजे खिचडी छान मोकळी होते.

११. सांबार बनवताना त्यात दुधी भोपळा, लाल भोपळा, वांगी यांसोबतच आपण मटार, फ्लॉवर, भेंडी, दोडका, गवार, मेथीची पाने अशा विविध भाज्या वापरून सांबार अधिक पौष्टिक करू शकतो.

१२. सांबारामध्ये शेंगा शिजून वेगळ्या होतात. म्हणून शेंगा शिजल्यावर त्यांतील गर काढून घ्यावा, साल टाकावे व गर सांबरात घालावा.

१. आठवड्याला लागणाऱ्या सर्व भाज्या साफ करून पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यांत ठेवाव्यात.

२. एक ओला नारळ किसूनडब्यात भरून ठेवावा. म्हणजेे भाज्या करताना सोपे जाते. फक्त डब्यातून खोबरे काढताना नेहमी चमचा वापरावा. हाताने काढल्यास खोबरे लवकर खराब होते.

३. कांदा+खोबरे भाजून डब्यात भरून ठेवावे, म्हणजे कडधान्यांच्या उसळी, तसेच नॉनव्हेज करताना चमच्याने थोडे काढून वापरता येते.

४. कांदा थोडा वेगळा तळून ठेवावा. नॉनव्हेजसाठी, बिर्याणीसाठी वापरता येतो.

५. कोथिंबीर धुऊन पेपरवर सुकवून बारीक कापून डबीत भरून ठेवावी.

६. आठवड्याच्या चहाला लागणारे आले धुऊन, पुसून, किसून एका छोट्या डबीत भरून ठेवावे. म्हणजे गडबडीच्या वेळेला वापरता येते.

७. गवती चहादेखील धुऊन, सुकवून, कात्रीने कापून, छोट्या डबीत भरून ठेवावा.

८. गरम मसाल्याची पूड आठवड्याला लागेल एवढीच करावी. म्हणजे त्याचा वास टिकून राहतो.

९. लसूण सोलून एका डबीत भरून ठेवावा.

१०. स्वयंपाकघरात नेहमी हात धुण्यासाठी लिक्विड सोपची एक बॉटल ठेवावी.

११. कडधान्य भिजवताना एका वेळेस दोन वेगवेगळी धान्ये एकत्र भिजवावीत. एक वापरावे व दुसरे मोड येण्यासाठी ठेवावे. ऐनवेळेला पाहुणे आले तर सोपे जाते.

१२. मासे जास्त आणले गेल्यास दोन भाग करावेत व लगेचच स्वच्छ धुऊन, मीठ व हळद लावून, हवाबंद डब्यात भरून, फ्रीजरमध्ये ठेवावे. वापरण्याच्या आधी तीन तास अगोदर डबा बाहेर काढून ठेवावा व वापरावा.

१३. चिकन स्टोअर करतानादेखील त्याला मीठ व मसाला लावून ठेवावे.

१४. आले+लसूण+मिरची+कोंथिंबीर यांची थोडी पेस्ट करून ठेवावी.

१५. पाहुणे यायचे असल्यास एक दिवस अगोदरच लागणारे ताटे, वाट्या व इतर भांडी काढून स्वच्छ करून ठेवावीत.

१६. बडीशेप भाजून ठेवावी.

१७. एक मोठा गुळाचा खडा किसून ठेवावा. आयत्या वेळी गडबड होत नाही.

१८. कडधान्ये, तांदूळ भिजवताना नेहमी दोनवेळा स्वच्छ धुऊन भिजवावेत.

१९. बाजारातून रवा आणल्यावर निवडून मंद गॅसवर कोरडाच गरम करून ठेवावा म्हणजे रव्याला कीड लागत नाही.

२०. स्वयंपाक करताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरावेत. मसाले छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवावेत व त्यांच्या नावाचे लेबल डब्यावर लावावे.

२१. रोजच्या वापरातील पदार्थांना अनुसरून क्रॉकरी वापरावी.

२२. वर्षाचे साले दळून आणल्यावर एकत्र न ठेवता अर्ध्या किलोच्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवावेत.